पुणे : जागतिक साहित्यात आपला वेगळा ठसा उमटविणारे प्रतिभावंत लेखक जी. ए. कुलकर्णी यांच्या योगदानाला मानवंदना देण्यासाठी त्यांचे नाव नभांगणातील एका तेजस्वी ताऱ्याला देण्यात आले आहे. यामुळे आकाशात आता जी. ए. कुलकर्णी यांच्या नावाचा तारा लुकलुकणार आहे. नामकरण करण्यासंदर्भातील प्रक्रिया पूर्णत्वास आली असून, जर्मनीच्या ‘स्टार रजिस्ट्रेशन’ या संस्थेचे अधिकृत प्रमाणपत्र जी. ए. कुलकर्णी यांच्या भगिनी नंदा पैठणकर यांच्याकडे त्यांनी सुपूर्त केले. हा तारा आकाशात कायमस्वरूपी चमकत असला, तरी पुण्याच्या क्षितिजावर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात दररोज रात्री आठ ते नऊ या वेळात तेजस्वीपणे दिसणार आहे.
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे नाव आकाशातील ताऱ्याला यापूर्वी देण्यात आले होते. त्याचप्रमाणे आता जी. ए. कुलकर्णी यांच्या नावाचा तारा आकाशामध्ये चमकणार आहे. जी. ए. कुलकर्णी यांच्या योगदानाला मानवंदना देण्यासाठी काहीतरी वेगळे करावे, ही संकल्पना हंस प्रकाशनच्या हेमा अंतरकर यांच्या मनात आली. त्यादृष्टीने या उपक्रमासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व सोपस्कारांची माहिती देत अंतरकर यांनी यासंबंधीचे जर्मनीच्या ‘स्टार रजिस्ट्रेशन’ या संस्थेचे अधिकृत प्रमाणपत्र जी. ए. कुलकर्णी यांच्या भगिनी नंदा पैठणकर यांच्याकडे सुपूर्त केले. या प्रमाणपत्रावर ‘फॉर ॲन आउट ऑफ दिस वर्ल्ड रायटर ॲन आउट ऑफ धिस वर्ल्ड ऑफरिंग-विथ लव्ह फ्रॉम हंस प्रकाशन’ असे नमूद केले आहे. ताऱ्याचा शोध घेण्याच्या कामी अंतरकर यांना हौशी खगोल निरीक्षक मितेश पुणतांबेकर यांचे सहकार्य लाभले.
अंतरकर म्हणाल्या की, जी. ए. कुलकर्णी यांचे कार्य तेजस्वी ताऱ्याप्रमाणे आहे. त्यांच्या कार्याला वेगळ्या उपक्रमातून मानवंदना द्यावी, असे अनेक दिवसांपासून वाटत होते. दरम्यान, १० जुलै २०२३ रोजी त्यांचा १०१ वा जन्मदिन होता. त्यानिमित्ताने या उपक्रमासाठीची प्रक्रिया सुरू केली. ध्रुवताऱ्याजवळ ध्रुवमत्स्य किंवा ऊर्सा मायनर या नक्षत्रामधील तो एक तेजस्वी तारा आहे. पुण्याच्या क्षितिजावर उत्तर दिशेला १० जुलै रोजी रात्री आठ ते नऊच्या दरम्यान नुसत्या डोळ्यांनीही तारा दिसू शकेल. हा तारा जीएंच्या प्रतिभेची साक्ष देत हजारो वर्षे आकाशात चमकत राहील.
जी. ए. कुलकर्णी ताऱ्याची वैशिष्ट्ये…
* सूर्यापासून सुमारे १०० प्रकाश वर्षे दूर
* सूर्यापेक्षा दुप्पट आकार
* सूर्यापेक्षा १ पूर्णांक ३५ शतांश जास्त वजन
* ताऱ्याचे वय सुमारे १ अब्ज वर्षे आहे.
* नुसत्या डोळ्यांनी पाहता येईल.
* सॉफ्टवेअरच्या मदतीने ताऱ्याची अवकाशात स्थाननिश्चिती करणे शक्य.