तळेगाव दाभाडे (पुणे): मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन.के. पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे उप सचिव अनिरुध्द जेवळीकर यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
एक जून रोजी पाटील यांनी धोकादायक पद्धतीने चारचाकी वाहन चालवत तळेगाव येथे दोन वाहनांना जोरदार धडक दिली होती. त्यानंतर झालेल्या तपासात एन. के. पाटील यांनी मद्य सेवन केले असल्याचे आढळून आले होते. त्याबाबतचे रिपोर्ट हे न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेतून प्राप्त झाले होते. तसेच पाटील यांचे महिला अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासोबत असलेले वागणे हे अशोभनीय व असभ्य असल्याचे पुणे जिल्हाधिकारी यांनी नगरविकास विभागाला कळविले होते. पाटील यांच्यावर दाखल झालेले गुन्हा व महिला कर्मचारी यांच्यासोबत असलेल्या अशोभनीय वर्तणुकीचा अहवाल शासनाकडे प्राप्त झाला होता. त्यांच्या या वर्तणुकीमुळे महाराष्ट्र शासनाची प्रतिमा मलिन होत असल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले असल्याचे आदेशात म्हटले आहे.