पुणे : तलाठी हे क्षेत्रीय स्तरावरील सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे पद असून, जनतेला आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो. तसेच शेतक-यांशी निगडित पीक पाहणीची ई-पिक पाहणी या मोबाईल अॅप द्वारे नोंदणी करणे, नुकसानीचे पंचनामे करणे, दुष्काळ, अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती इत्यादी प्रसंगी मदत व पुर्नवसनाचे काम करणे यासाठी तलाठी व मंडळ अधिकारी हे अतिशय महत्वाचा दुवा आहेत. परंतु तलाठी व मंडळ अधिकारी हे त्यांच्या कार्यालयाच्या ठिकाणी उपलब्ध राहत नसल्याच्या तक्रारी सरकारला जनतेकडून तसेच लोकप्रतिनिधींकडून वारंवार करण्यात येत आहेत. जनतेची गैरसोय टाळण्यासाठी सर्व तलाठ्यांनी सज्जाच्या ठिकाणी उपस्थित राहण्याबाबतच्या सूचना सरकारने परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अनेकदा तहसिल कार्यालय, उपविभागीय कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित केलेल्या बैठका या दुपारच्या सत्रात असतात. या बैठकांना उपस्थित राहण्यासाठी संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी हे सकाळपासूनच त्यांच्या मुख्यालयात उपस्थित नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. या प्रकारामुळे तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडे कामानिमित्त येणाऱ्या जनतेला आवश्यक त्या वेळेत त्यांच्या सेवा उपलब्ध होत नसल्याने जनतेची गैरसोय होत आहे. याबाबत सामान्य जनतेत शासनाच्या विरोधात असंतोष निर्माण होत आहे.
जनतेची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त वेळ त्यांच्या कार्यालयाच्या ठिकाणी उपस्थित राहण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत.
– जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय व तहसिल कार्यालय यांनी त्यांच्याकडील आयोजित केलेल्या बैठकीला तलाठी व मंडळ अधिकारी यांना निमंत्रित करावयाचे असल्यास, या बैठका सकाळच्या सत्रात आयोजित कराव्यात. बैठकीनंतर तलाठी व मंडळ अधिकारी हे दुपारच्या कामकाजाच्या सत्रात त्यांच्या कार्यालयात उपस्थित राहतील यांची त्यांनी दक्षता घ्यावी.
– जनतेची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी.
– सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना सूचित करण्यात येते की, त्यांनी त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व विभागप्रमुख/कार्यालयीन प्रमुख, तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालये यांच्या निदर्शनास ही बाब आणून द्यावी.
– सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संकेतांक २०२४०१२५१९५५२१०५१९ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.