पिंपरी : लग्नकार्यात होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन चोरटे नामी संधी साधतात. अशीच एक घटना तळेगाव दाभाडे परिसरात घडली आहे. लग्नसमारंभात जाऊन वराच्या आईने पर्समध्ये ठेवलेले तब्बल ४ लाख ८३ हजार ५०० रुपयांचे दागिने एका महिलेने चोरून नेल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. हा प्रकार २० जानेवारी रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास सोमाटणे येथील इमराल्ड हॉटेलमध्ये घडला.
याबाबत महिलेने शुक्रवारी (ता. २६) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमाटणे येथील इमरॉल्ड हॉटेल येथे फिर्य़ादीच्या मुलाचे लग्न होते. याच ठिकाणी २० जानेवारी रोजी रात्री संगीताचा कार्यक्रम होता. फिर्यादी संगीताच्या कार्यक्रमात व्यग्र असताना एका अनोळखी महिलेने लग्न सोहळ्यात येऊन फिर्य़ादीच्या अर्थात वरमायच्या पर्समधून तब्बल ४ लाख ८३ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल असा ऐवज चोरून नेला.
या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंपणे करीत आहेत.