पुणे : ज्येष्ठ नागरिकांच्या भोळेपणाचा गैरफायदा घेऊन लूट केल्याची घटना पुण्यातील धायरी परिसरात घडली आहे. दत्त मंदिरात दान करण्याच्या बहाण्याने दोन तरुणांनी एका ज्येष्ठ नागरिकाकडून सोन्याची अंगठी घेतली. त्यानंतर हातचलाखीने अंगठी लंपास करुन ज्येष्ठाची तब्बल ९० हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी २५ ते ३० वर्षे वयोगटातील दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना बुधवारी (ता. २३) दुपारी एकच्या सुमारास धायरी येथील पोकळे एम्पायर समोर घडली. याबाबत नामदेव गोविंदा पोकळे (वय-७०, रा. पोकळे वडापाव, गणेश नगर, धायरी) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुरुवारी (ता. २५) फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी ज्येष्ठ नागरिक असल्याचा आणि त्यांच्या भोळेपणाचा गैरफायदा घेतला. यांच्याजवळ येऊन त्यांचे चुलते वारल्याचे सांगितले. तसेच त्यांना दत्त मंदिरात दान करायचे असल्याचे सांगून दत्त मंदिर कुठे आहे, अशी विचारणा केली. त्यावेळी त्यांच्याजवळ असलेली पाचशे रुपयांची नोट फिर्यादी यांना दाखवली. या नोटेवर सोने घासायचे असल्याचे सांगून फिर्यादी यांच्याकडून त्यांच्या बोटात असलेली २० ग्रॅम वजनाची अंगठी मागितली. फिर्यादींनी आरोपींवर विश्वास ठेवून तब्बल ९० हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी आरोपींकडे दिली.
दरम्यान, दोघांनीही सोन्याची अंगठी पाचशे रुपयांच्या नोटेवर घासून अंगठी नोटेवर ठेवली. त्यानंतर नोटेची घडी घालून पैसे मंदिरात दान करा, असे सांगितले. दरम्यान, चोरट्यांनी फिर्यादीचे लक्ष विचलीत करुन हातचलाखीने अंगठीऐवजी नोटेमध्ये दगड ठेवला. त्यानंतर चोरटे फिर्यादीची सोन्याची अंगठी घेऊन पसार झाले.
काही वेळाने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नामदेव पोकळे यांनी पोलिसांकडे तक्रार केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर करीत आहेत.