पुणे : बारामती लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला आहे. सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यामंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा दारुण पराभव केला आहे. हा पराभव अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जातो.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्ते नैराश्यातून बाहेर येण्यास तयार नाहीत. आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने पक्षातील सुस्तपणा परवडणारा नाही. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख असलेल्या अजित पवारांकडे सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर घेण्याची मागणी केली.
पुण्यातील नारायण पेठ येथील पक्ष कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २५ वा वर्धापन दिवस साजरा केला. या कार्यक्रमानंतर शहराध्यक्ष दीपक मानकर आणि कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सर्वानुमते एक ठराव मांडण्यात आला.
या ठरावाद्वारे सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर नियुक्ती करून त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पद देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. सुनीता पवार राज्यसभेवर गेल्या तर बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना बळ मिळू शकेल अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्याने त्यांचे दिल्लीत जाण्याचे स्वप्न अधूरे राहिले आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवारांना दिल्लीत पाठवण्याचा जणू चंगच बांधला आहे. त्यामुळेच की काय पुण्यात आज झालेल्या बैठकीत याविषयी ठराव करण्यात आला. सुनेत्रा पवारांना राज्यसभेत पाठवण्यासंबंधीचा हा ठराव पक्षप्रमुख अजित पवार यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे या ठरावावर अजित पवार काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.