गणेश सुळ
केडगाव : बुलेटला वेगळ्या आवाजाचा सायलेन्सर बसवून कानठळ्या बसवणारा आवाज करणार्या चालकांवर दौंड व यवत पोलीस ठाण्याअंतर्गत येणार्या पोलीस चौकीतील पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
दौंड तालुक्यातील सर्वच महाविद्यालय परिसरात बुलेट गाडीच्या सायलेन्सरमधून फटाक्यांसारखा जोरात आवाज काढून परिसरातील नागरिकांना त्रास देणार्या व फुशारकी मारत कानठळ्या बसवणारा आवाज काढणार्या चालकांवर पोलिसांनी कारवाई करत, जास्तीत जास्त दंड ठोठावून गाडीला बसवलेले सायलेन्सर काढून घ्यावेत, अशी मागणी जोर धरत आहे.
दौंड तालुक्यात अनेक अल्पवयीन मुले दुचाकी चालवताना दिसत आहेत. वाहतुकीचे कोणतेही नियम माहिती नसताना वेगात दुचाकी चालवल्या जातात. यातून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. अनेकदा याचा त्रास सर्वसामान्य मुलांना होत आहे. या प्रकारामुळे अल्पवयीन मुलांमध्ये भाईगिरी वाढीस लागली आहे. सातत्याने भांडणाचे प्रकार होत आहेत. पोलिसांनी तत्काळ कारवाई केल्यास, या कारवाईचे सर्वत्र कौतुक होईल. या कारवाईत सातत्य राखण्याचे काम पोलीस यंत्रणेने करावे, अशी मागणी होत आहे.
सामान्य कुटुंबातील मुले-मुली सायकल अथवा पायी प्रवास करत महाविद्यालयात येतात. परंतु सायलेन्सर व हॉर्न वाजवत फिरणाऱ्या तरुणांमुळे प्रवासाला अडथळा निर्माण होत आहे. अल्पवयीन मुलांच्या मनावर याचा विपरीत परिणाम होत आहे. शिवाय अपघातांचे प्रमाण देखील वाढत आहे. यामुळे संबंधितांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.