बारामती : बारामती तालुक्यातील मौजे बऱ्हाणपुर येथे दरवर्षी भैरवनाथ यात्रा आयोजित करण्यात येते. यंदाही १६ मे रोजी यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेनिमित्त गावात आर्केस्ट्रा आयोजित केला होता. त्या कार्यक्रमांमध्ये काही अज्ञात लोकांनी भांडणे करत गोंधळ घालून ऑर्केस्ट्रातील महिला कलाकारांना शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला. तसेच त्यांचे मेकअपरूम मधील साहित्य बाहेर फेकून देत दहशत निर्माण केली.
याप्रकरणी यात्रा कमिटीचे अध्यक्ष अनिल भानुदास गवळी यांनी बारामती पोलीस ठाण्यात १९ मे रोजी फिर्याद दिली आहे. तसेच त्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांना दिले आहेत. त्या आधारे अज्ञात लोकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.