पुणे : पुणे शहरातील रस्ते आणि पदपथांवर नागरिकांनी छोट्या-मोठ्या टपऱ्या उभ्या करून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहेत. अनधिकृत बांधकामेही मोठ्या प्रमाणावर असून पालिका प्रशासनाकडून कारवाई केली जात नसल्याने नागरिकांना चालण्यासाठी जागा नाही. त्यामुळे अतिक्रमणावर कारवाई करत असताना कोणत्याही राजकीय पदाधिकाऱ्याचा फोन केला, तरी त्यांचे ऐकू नका, तत्काळ कारवाई करा, असे आदेश सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महापलिका प्रशासनाला दिले आहेत.
केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महापालिकेतील विकास प्रकल्पासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीला महापालिका आयुक्त प्रशासक डाॅ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्यासह अनेक विभागांचे प्रमुख अधिकारी तसेच भाजपचे माजी नगरसेवकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. नागरिकांना चालण्यासाठी पदपथ शिल्लक राहिलेले नाहीत. महापालिका अधिकाऱ्यांना वारंवार याबाबतची माहिती देऊन देखील कारवाई होत नसल्याच्या तक्रारी भाजपच्या माजी नगरसेवकांनी मोहोळ यांच्याकडे केल्या आहेत.
त्यावर बोलताना मोहोळ म्हणाले कि, पालिका क्षेत्रातील रस्ते अतिक्रमणमुक्त करणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. शहरातील सर्व रस्त्यांचे अतिक्रमण काढले पाहिजेत. महापालिका प्रशासनाने यामध्ये टाळाटाळ केलेली अजिबात चालणार नाही. अनेक वेळा महापालिकेचा अतिक्रमण विभाग कारवाईला जाण्याच्या अगोदर ज्या ठिकाणी कारवाई होणार आहे, त्या ठिकाणी फोन करून सांगण्यात येते. असे कोणी अधिकारी अथवा कर्मचारी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत.