पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. त्या अनुषंगाने पुणे शहरामध्ये विविध प्रकारे कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुणे पोलिसांची धडक कारवाई सुरु आहे. अशातच तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून शहरात आलेल्या एका सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 5 च्या पथकाने अटक केली आहे. ही कारवाई माळवाडी, हडपसर परिसरात केली. आदित्य उर्फ दाद्या बबन शिंदे (वय-24 रा. कामठेवस्ती, माळवाडी, हडपसर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, गुन्हे शाखा युनिट-5 चे पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हद्दीत पेट्रोलींग करत असताना पोलीस अंमलदार अकबर शेख यांना माहिती मिळाली की, पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार गुन्हेगार आदित्य उर्फ दाद्या शिंदे याच्याकडे धारदार शस्त्र असून तो गंभीर गुन्हा करण्यासाठी माळवाडी, हडपसर परिसरात वावरत आहे. माहिती मिळताच तपास पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता तो विनापरवानगी शहरात आल्याचे निष्पन्न झाले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक तलवार जप्त केली.
आरोपी आदित्य शिंदे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याला पुणे शहर व संपूर्ण जिल्ह्यातून तडीपार केले होते. तडीपारीच्या आदेशाचा भंग करुन आरोपी शहरात आला होता. पोलिसांनी त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.