पुणे : आळंदी ते मोशी रोडवरील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा कट तडीपार व इतर गुन्ह्यांमध्ये वाँटेड असलेल्या आरोपींनी आखला होता. मात्र, त्याअगोदरच पोलिसांनी त्यांच्यावर धाड टाकली. या कारवाईत तिघांना अटक केली आहे, तर अंधाराचा फायदा घेऊन तिघे पळून गेले. ही कारवाई दिघीतील आदर्शनगर परिसरात शिव कॉलनी येथे खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाने केली.
आरोपींकडून दोन कोयते, एक पालघन, एक लायटर पिस्टल, नायलॉन दोरी, मिर्ची पावडर, सहा मोबाईल, दोन मोटारसायकल व एक स्कु ड्रायव्हर असा २ लाख ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अर्जुनसिंग सुरजितसिंग भादा (वय २२, रा. शिवकॉलनी, आदर्शनगर, दिघी), सोहेल अलिशेर मिर्झा (वय २२, रा. वडारवस्ती, विश्रांतवाडी), रोमन दस्तगीर मुल्ला (वय २०, रा. चौधरी पार्क, दिघी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचे साथीदार बादशाहसिंग पोलादसिंग भोंड (रा. दिघी), आकाश सुधीर साळवी (रा. दिघी), चेतन ऊर्फ चेप्या पांचाळ (रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) अशी पळून गेलेल्यांची नावे आहेत. त्यांचा शोध घेतला असता आकाश सुधीर साळवी (वय २२, रा. प्रेमसुंदर निवास, दिघी) हा मिळून आला.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तडीपार आरोपी चेक करीत असताना खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुनिल भदाणे व सहकारी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी हवालदार प्रदीप पोटे व किरण जाधव यांना बातमी मिळाली की, दिघीतील आदर्शनगर परिसरात काही व्यक्ती शिव कॉलनीच्या बाजूला थांबले असून त्यांच्याकडे घातक शस्त्रे आहेत.
या बातमीची खात्री करण्यासाठी पोलीस पथक त्या ठिकाणी गेले. त्यांनी सर्वांना घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन तिघे पळून गेले. तर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडे चौकशी केली असता आळंदी ते मोशी रोडवरील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी ते एकत्र जमल्याची माहिती दिली.
दरम्यान, आरोपींवर दरोडा, दरोड्याची तयारी, खुनांचा प्रयत्न, जबरी चोरी, वाहन चोरी, दहशत माजविणे, गंभीर दुखापत करणे, अवैध शस्त्र बाळगणे, घरफोडी, अंमली पदार्थ विक्री करणे, वाहनांची तोडफोड करणे असे वेगवेगळे गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. आरोपी सोहेल मिर्झा व रोमन मुल्ला हे तडीपार असून अर्जुनसिंग भादा हा दोन गुन्ह्यात वाँटेड होता. तसेच आकाश साळवी एका गुन्ह्यात वाँटेड होता.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सुनिल भदाणे, पोलीस अंमलदार प्रदीप पोटे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस अंमलदार नागेश माळी व पोपट हुलगे यांच्या पथकाने केली.