लोणी काळभोर: थेऊर (ता. हवेली) येथील “यशवंत”च्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, संचालक रोहिदास उंद्रे यांच्या नेतृत्वाखालील अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनलला “किटली” तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रताप अण्णा गायकवाड, प्रकाश जगताप, विद्यमान संचालक प्रशांत काळभोर व कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखालील अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी “कपबशी” हे निवडणुक चिन्ह मिळाले आहे.
“यशवंत”च्या संचालक मंडळाच्या २१ जागांच्यासाठी दोन प्रमुख पॅनेलमधील बेचाळीस उमेदवारांसह तब्बल ५४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. संचालक मंडळाची प्रत्यक्ष निवडणुक येत्या नऊ मार्च रोजी होत असून, कारखान्यावर सत्ता मिळवण्यासाठी अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल व अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी या दोन प्रमुख पॅनेलमध्ये किटली व कपबशी या दोन प्रमुख चिन्हांच्या माध्यमातून लढाई होणार आहे. कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या दोन्ही पॅनलमधील उमेदवार आर्थिकदृष्ट्या संपन्न असल्याने या निवडणुकीत पैशाचा वापर मोठया प्रमाणात होणार, हे स्पष्ट झाले आहे. कारखाना बंद असला तरी, कारखान्याच्या मालकीची अडीचशे एकर जमीन डोळ्यासमोर ठेऊनच ही निवडणुक लढली जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान यशवंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ९ मार्च रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी ३२० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मंगळवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी १ तास वेळ वाढवून दिली होती. या वेळेत २६६ उमेदवारी अर्ज माघारी घेण्यात आले. तरीही दोन्ही पॅनेलचे उमेदवार वगळता अजून १२ जणांचे उमेदवारी अर्ज रिंगणात आहेत. गट क्र १ मध्ये ३ जागांसाठी ७ उमेदवारी अर्ज, गट क्र २ मध्ये ३ जागांसाठी ८ उमेदवारी अर्ज, गट क्र ३ मध्ये ३ जागांसाठी ७ उमेदवारी अर्ज, गट क्र ४ मध्ये २ जागांसाठी ४ उमेदवारी अर्ज, गट क्र ५ मध्ये २ जागांसाठी ७ उमेदवारी अर्ज व गट क्र ६ मध्ये २ जागांसाठी ५ उमेदवारी अर्ज रिंगणात राहिले आहेत. उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक व पणन संस्था (ब वर्ग) गटात १ जागेसाठी २ उमेदवारी अर्ज, महिला राखीव गटात २ जागांसाठी ४ उमेदवारी अर्ज, अनुसूचित जाती जमाती गटात १ जागेसाठी ३ उमेदवारी अर्ज, इतर मागासवर्गीय गटात १ जागेसाठी ५ उमेदवारी अर्ज, विमुक्त जाती जमाती गटात १ जागेसाठी २ उमेदवारी अर्ज रिंगणात आहेत.
निवडणुकीसाठी दोन्ही पॅनेलचे ४२ उमेदवार वगळता गट क्रमांक १ मध्ये सदानंद यशवंत बालगुडे, गट क्रमांक २ मध्ये धनंजय नानासाहेब चौधरी, राजेश लक्ष्मण चौधरी, गट क्रमांक ३ मध्ये हिरामण नारायण काकडे, गट क्रमांक ५ मध्ये अमोल भिकोबा गायकवाड, भाऊसाहेब ज्ञानोबा गायकवाड, राजाराम पंढरीनाथ गायकवाड, गट क्रमांक ६ मध्ये अनिल रामचंद्र चोंधे यांचे उमेदवारी अर्ज रिंगणात राहिले आहेत. अनुसूचित जाती जमाती गटात अंकुश अमृता कांबळे, इतर मागासवर्गीय गटात भाऊसाहेब ज्ञानोबा गायकवाड, मानसिंग बाळासाहेब गावडे, संतोष पोपट हरगुडे यांचे उमेदवारी अर्ज रिंगणात राहिले आहेत. गट क्र ४, उत्पादक व बिगर उत्पादक सहकारी संस्था व पणन संस्था, महिला व विमुक्त जाती जमाती या चार गटात दोन्ही पॅनेलचे वगळता इतर उमेदवार नसल्याने या चार गटात सरळ लढती होणार आहेत. उमेदवारी अर्ज माघारी न घेतलेल्या उमेदवारांनी आपल्या पॅनेलला पाठिंबा द्यावा, यासाठी दोन्ही पॅनेलचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल व अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी या दोन प्रमुख पॅनेलच्या प्रचाराला उद्या गुरुवारपासुन सुरुवात होणार आहे. प्रचारामध्ये दोन्ही पॅनेल एकमेकांवर जोरदार टीका करण्याची शक्यता आहे. कारखाना बंद का पडला? ते निवडून आल्यावर आम्ही कारखाना कसा सुरु करणार? या संदर्भात दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर वेगवेगळी आयुधे सोडली जाणार आहेत. समोरच्या बाजूकडून आलेल्या टिकेला कशा पद्धतीने उत्तर दिले जाते. ते उत्तर शेतकरी सभासदांना किती पटणार? मान्य होणार ? यावरच विजयाचा लंबक कोणाकडे जाणार हे ठरणार आहे. एकंदरीत आगामी काही दिवस होणाऱ्या प्रचारात शेतकरी सभासद कारखान्याची चावी कुणाकडे देणार हे ठरणार आहे.