पुणे : भारतीय शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांचे शनिवारी १३ जानेवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अमेरिकस्थित त्यांची भाची सोमवारी पुण्यात आल्यानंतर अत्रे यांच्या पार्थिवावर सोमवारी १५ जानेवारी रोजी शासकीय इतमामात दुपारी एक वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यापूर्वी छत्रपती संभाजी उद्यानासमोरील स्वरमयी गुरुकुल या त्यांच्या निवासस्थानी सकाळी नऊ ते बारा या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर जंगली महाराज रस्त्यावरुन वैकुंठ स्मशानभूमीकडे अंत्ययात्रा मार्गस्थ होईल, अशी माहिती डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशनच्या सचिव डॉ. भारती यांनी दिली आहे. भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात डॉ. प्रभा अत्रे यांनी फार मोठे योगदान दिले आहे. किराणा घराण्याच्या त्या ज्येष्ठ गायिका होत्या. त्यांना प्रतिष्ठेचे अनेक पुरस्कार, सन्मानांनी गौरवण्यात आले आहे.