पुणे : पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात पतीने पत्नीवर चाकूने सपासप वार करुन गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना गुरुवारी (दि.18) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याबाबत अनिता सुरेश शिंदे (वय-41 रा. ओमकार सोसायटी, कात्रज-कोंढवा रोड, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरून आरोपी सुरेश रामराव शिंदे (वय-45) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेश हा बिगारी काम करतो. तो त्याची पत्नी अनिता हिच्या चारित्र्यावर सतत संशय घेत असल्याने त्यांच्यात वाद होत होते. गुरुवारी सकाळी त्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन वाद घालायला सुरुवात केली. त्यानंतर चाकूने पत्नीच्या शरीरावर सपासप वार करुन तिला गंभीर जखमी केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.