पुणे : मागील आठवड्यात शहरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. पुण्यातील पूर परिस्थितीत कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी महापालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांना निलंबित करण्यात आले आहे. मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी ही कारवाई केली आहे.
दरम्यान, खडकवासला धरणातून अचानक रात्री पाणी सोडण्यात आल्याचा ठपका पालिका प्रशासनाने जलसंपदा विभागावर ठेवला आहे. तर पाणी सोडण्याबाबतची माहिती आधीच दिल्याचा दावा या विभागाने केला आहे. त्यामुळे या दोन यंत्रणांमध्येच वाद सुरु असून त्याचा पहिला बळी खलाटे ठरले आहेत, अशी चर्चा आता पालिका वर्तुळात सुरु आहे.
दरम्यानच्या काळात या पूरग्रस्त परिसरात राजकीय नेत्यांचे दौरे सुरू असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दुसऱ्या बाजूला पूरामुळे मोठे नुकसान झालेल्या नागरिकांचा संताप अनावर होताना दिसत आहे.