पुणे: निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांना बीड पोलिसांनी पुण्यातील स्वारगेट परिसरातील एका हॉटेलमधून अटक केली आहे. कासले यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप केले होते. वाल्मिक कराडचे एन्काऊंटर करण्यासाठी मला ऑफर देण्यात आली होती असा दावा कासलेने केल्याने अनेकांना धक्का बसला होता आणि त्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड केल्या प्रकरणी गप्प राहिल्याबद्दल महादेव कराड आणि काळे यांच्या मालकीच्या संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनीतून कासलेच्या बँक खात्यात १० लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप कासले यांनी केला होता.
काल रात्री दिल्लीवरून पुण्यात आल्यानंतर कासले हॉटेलमध्ये मुक्कामी होते. कासले यांनी पुणे विमानतळावर माध्यमांशी संवाद साधताना अनेक गंभीर आरोपी केल्याने राज्यात खळबळ उडाली होती. पुणे पोलिसांना शरण जाणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. यासंबंधी कारवाई करतांना आज पहाटे बीड पोलिसांनी ताब्यात घेतले. कासले यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे राज्यभर खळबळ उडाली आहे आणि राजकीय प्रक्रियेच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कासले यांच्या दाव्यांमुळे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड दोघांनाही चौकशीच्या भोवऱ्यात अडकवले आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या तपासाचे महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर महत्त्वपूर्ण परिणाम होण्याची शक्यता आहे.