पुणे : निलंबित आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर हे लोकसभा निवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. त्याकरिता त्यांनी भाजपकडे उमेदवारी मागण्याची तयारी सुरू केली आहे. जर, भाजपने उमेदवारी दिली नाही, तर अपक्ष विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार देखील त्यांनी केला आहे. दिलीप खेडकर हे पाथर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भाजपचे माजी पाथर्डी तालुकाध्यक्ष माणिक खेडकर उपस्थित होते.
दिलीप खेडकर विधानसभेसाठी उतरणार मैदानात?
निलंबित प्रशिक्षणार्थी आएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील सेवानिवृत्त सनदी अधिकारी दिलीप खेडकर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडे उमेदवारी मागणार आहेत. भाजपने उमेदवारी दिली नाही, तर अपक्ष लढण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. तसेच शासकीय यंत्रणेचा गैरवापर करत माझ्या कुटुंबाला त्रास देण्याचा उद्योग जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी केला. असं असले तरीही पुन्हा एकदा जोमाने लढणार आहे, असे दिलीप खेडकर यावेळी म्हणाले.
तसेच पुढे बोलताना म्हणाले, स्वकष्टाने सनदी अधिकारी झालो. निवृत्त झाल्यानंतर गावचा चेहरामोहरा बदलला. मराठा-ओबीसी संघर्षात ओबीसींची बाजू घेतली. मात्र, मराठा समाजाला विरोध केला नाही. लोकसभेला उभा राहिलो अन् माझ्या मुलाबाळांपर्यंत राजकारण करण्यात आले. पूजा खेडकर रुजू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून तिला त्रास देण्यास सुरुवात करण्यात आली. तिच्या विरोधात अहवाल बनवून तो परस्पर मीडियाला देण्यात आला, असंही दिलीप खेडकर यावेळी म्हणाले.