पुणे: वडगावशेरी मतदारसंघावर महाविकास आघाडीमधील शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँगेस (शरदचंद्र पवार) गट दावा करत आहेत. शिवसेनेकडे तुल्यबळ उमेदवार नसल्याने हा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी कगिसला जाणार असल्याचे निश्चित झाल्याने शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी वडगावशेरी मतदार संघातून निवडणूक लढवावी, असे फ्लेक्स येरवड्यात लागल्याने चर्चेला उधाण आले आहे. सुषमा अंधारे यांनी इच्छा व्यक्त केल्यास हा मतदारसंघ शिवसेनेला सोडावा लागेल. मात्र, भाजपमधून शरद पवार यांच्या येऊन ‘तुतारी’ चिन्हावर निवडणूक लढवण्यास इच्छुक असणाऱ्यांना
अडचणीचे ठरणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने बैठका आणि दौरे सुरू झाले आहेत. तर, विद्यमान आणि इच्छुक नेत्यांनीदेखील आपापल्या विधानसभा मतदारसंघात कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली आहे. पुणे शहरातील वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना उमेदवारी मिळावी, यासाठी येरवडा भागात मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स लावण्यात आले आहेत. ‘उच्चशिक्षित, निर्भीड, कणखर व्यक्तिमत्त्व वडगावशेरी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी एकच उत्तम पर्याय’ असे मजकूर असलेले फ्लेक्स अनेक भागात लावण्यात आले आहेत
आगामी काळात सुषमा अंधारे यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यास महाविकास आघाडीची समीकरणे बदलू शकतात. अंधारे याच मतदारसंघातील धानोरी भागात वास्तव्यास आहेत. त्या उमेदवार असल्यास शिवसेनेतील संजय भोसले, नितीन भुजबळ, सतीश मुळीक या इच्छुकांनादेखील शांत बसावे लागणार आहे. भाजपमधून राष्ट्रवादीत येण्यासाठी वेटिंगवर असणाऱ्या माजी आमदार बापुसाहेब पठारे, माजी नगरसेवक अनिल ऊर्फ बॉबी टिंगरे, सुरेंद्र पठारे यांच्यासाठीदेखील अडचणीचे ठरणार आहे. याबाबत सुषमा अंधारे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.