पुणे : मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे मागासलेपण तपासण्याचे काम सुरु आहे. यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने २० जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालये आणि महानगरपालिकांत खास प्रशिक्षणही दिले आहे. त्यानंतर आता पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुमारे १०,००० प्रगणकांमार्फत सर्वेक्षणाला सुरूवात झाली.
दरम्यान, सर्वेक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या मोबाइल ॲपमध्ये तांत्रिक अडचणी आल्याने पहिले २ दिवस संथगतीने सर्वेक्षण सुरु होते. तसेच जिल्ह्यातील दोन तालुके आणि १०० गावे सर्वेक्षणाच्या मोबाइल ॲपमध्ये दिसतच नसल्याची बाब समोर आली. यानंतर तातडीने एनआयसीने दुरुस्ती केली.
शुक्रवार, शनिवार आणि रविवार (२६, २७ आणि २८ जानेवारी) या शासकीय सुट्यांच्या कालावधीत सर्वेक्षणाशी संबंधित सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तहसील, प्रांत आणि जिल्हाधिकारी ही कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहेत. पुणे जिल्ह्यातील एक कोटीपेक्षा जास्त नागरिकांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्व तांत्रिक अडथळे दूर करून तिसऱ्या दिवशी म्हणजेच २५ जानेवारी पर्यंत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील मिळून ४ लाख २३ हजार ८५४ कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले आहे. असं निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी सांगितले.
पुणे शहर : १ लाख ७४ हजार २५७
पिंपरी-चिंचवड : १ लाख २ हजार २०२
पुणे ग्रामीण : १ लाख ४७ हजार ३९५
एकूण ४ लाख २३ हजार ८५४ कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण