-योगेश मारणे
न्हावरे : रांजणगाव सांडस-वाळकी बेट (ता.दौंड) येथील थोर संत श्री. संतराज महाराज देवस्थानचे अध्यक्ष, महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार, शिरुर भूषण, हभप.सुरेश अण्णासाहेब साठे महाराज यांचे आज (दि.15) पहाटे साडे चार वाजता हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 62 वर्षाचे होते. त्यांचे नागरगाव (ता.शिरूर) येथील राहत्या घरी निधन झाले.
पुराणामध्ये हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या प्रयाग इतकेच महत्त्व असलेल्या रांजणगाव सांडस संगम-वाळकी बेट(ता. दौंड) येथील वारकरी सांप्रदयाचे श्रद्धास्थान, थोर संत श्री.संतराज महाराज देवस्थानचे साठे महाराज हे 20 वर्षांपासून आजतागायत अध्यक्ष आहेत. सुरेश साठे महाराजांनी श्री. संतराज महाराज देवस्थानचे अध्यक्ष झाल्यापासून देवस्थानच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. तसेच देवस्थानचा विकास करून देवस्थान नव्याने नावारूपाला आणले. त्यामुळे देवस्थानच्या विकासासाठी साठे महाराज यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे.
जिल्ह्यामध्ये शिरूर, दौंड, बारामती, हवेली, पुरंदर, आंबेगाव, खेड त्याचप्रमाणे नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर या परिसरामध्ये साठे महाराजांना मानणारा भक्त वर्ग मोठ्या संख्येने आहे. साठे महाराजांच्या आकस्मित निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.