Supriya Sule : पुणे : दादाला लोकांचे भरभरुन प्रेम मिळाले आहे. आता माझे वय ८६ वर्षे आहे. लोकांनाही वाटते अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे. माझ्या देखतच दादाने राज्याचे मुख्यमंत्री व्हावे, हीच माझी सुद्धा इच्छा आहे, अशी अपेक्षा अजित पवार यांच्या आई आशाताई पवार यांनी व्यक्त केली. काटेवाडी ग्रामपंचायतीसाठी पवार कुटुंबाने मतदान केल्यानंतर त्यांच्या आईने ही इच्छा व्यक्त कली. आशाताई पवार यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कोणत्याही आईला आपल्या मुलाने मुख्यमंत्री व्हावे असे वाटते. आशाताईंनी देखील तीच अपेक्षा व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे या आज पुण्यात आहेत. पुण्यातील चांदणी चौक इथं त्यांनी भेट दिली. या पुलाची त्यांनी पाहणी केली. काही दिवसांआधी सुप्रिया सुळे यांनी चांदणी चौकातील रस्त्यांवरच्या खड्ड्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर त्यांनी आज या पुलाची पाहणी केली. या वेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.
या वेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवार यांना डेंग्यू झाला आहे. त्यांना अजूनही अशक्तपणा असल्यामुळे आरामाचा सल्ला दिला आहे. आरोग्यामध्ये राजकारण आणणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसत नाही. हे माझे वैयक्तिक मत आहे. शेवटी तो माझा भाऊ आहे. त्यामुळे त्याची चौकशी रोजच करते. बरे झाल्यावर मी त्याला भेटायला जाणार आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
चांदणी चौकाच्या कामाची श्वेत पत्रिका काढा, असे सुळे यांनी सांगितले. नितीन गडकरी यांनी संपूर्ण देशात चांगले रस्ते केले. पण चांदणी चौकाच्या कामाला दृष्ट लागली का? अधिवेशनात गडकरी यांची वेळ घेऊन हा विषय मी मांडणार आहे. पादचाऱ्यांचा विचार याठिकाणी केला गेलेला नाही. अपघात व्हायची वाट का बघत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ शून्य अपघात करण्याचा आमचा मानस आहे. यात राजकारण कुठेही करु नये, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.