बारामती : मागील काही दिवस झाले बारामतीचा दादा बदलणार अशी चर्चा सुरु होती. त्यात काही स्थानिकांनी आमचा दादा बदला म्हणून शरद पवार यांच्याकडे मागणी केली होती. नवीन दादा कोण तर युगेंद्र पवार यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत होती. परंतु अशातच राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी बारामतीच्या राजकारणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी विधानसभा निवडणूक आणि युगेंद्र पवारांच्या उमेदवारीची चर्चा यावर भाष्य केलंय. तसंच शरद पवारांच्या दुष्काळी दौऱ्यावरही त्यांनी भाष्य केलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काळा दरम्यान अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी मतदारसंघाचा दौरा केला होता. त्यानंतरही ते मतदारसंघात सक्रिय असल्याचे बघायला मिळत आहे. शरद पवार सध्या दुष्काळी दौरा करत आहेत. शरद पवार आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे आमागी विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांना बारामतीतून उमेदवारी दिली जाऊ शकते अशी चर्चा जोर धरू बघत आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे. युवेंद्र पवार बारामतीचे नवे ‘दादा’ आहेत का? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. तेव्हा सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं.
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?
युगेंद्र पवार चार वर्षापासून बारामतीत फिरतोय. विद्या प्रतिष्ठानमध्ये चांगलं काम आहे, लोकांची कामं करतोय, स्थानिक लोकांचे प्रश्न सोडवतोय. आघाडी नेते काय ते निर्णय घेतील. तो फिरतोय म्हणून त्याला उमेदवार दिली जाईल किंवा नाही, याची चर्चा फार लवकर होत आहे. असं मला वाटतं. बघूया पुढे काय होतं ते, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
शरद पवार सध्या दुष्काळी दौरा करत आहेत. बारामती आणि परिसरातील शेतकरी मेळाव्यांना ते हजेरी लावत आहेत. यावर चांगल्या मार्काने पास होण्यासाठी प्रयत्न करत असतात. महाविकास आघाडी म्हणून अनेक मुद्द्यांवर आम्ही काम करत आहोत. अनेक चांगले निर्णय घेतले पण गेल्या दोन अडीच वर्षात महायुतीचे सरकार आल्यापासून कोणते चांगले निर्णय घेतले राज्यात, देशात?, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
रोहित पवार-जयंत पाटलांमध्ये वितुष्ट
रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यात वाद असल्याची चर्चा होते. यावर हे सगळं मीडियाकडून क्रिएटेड आहे. गैरसमजातून होणाऱ्या ह्या बातम्या आहेत. याच्यावर कोण्याही जबाबदार व्यक्तींनी भाष्य करू नये. शब्दाला शब्द वापरला जातो आणि चुकीची माहिती अनेक वेळा उत्सुकतेभरात बाहेर येत असते. आता फक्त एकच लक्ष आहे विधानसभा, असं सुप्रिया सुळे म्हणल्या.