पुणे : अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गोळीबाराचा आवाज झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरात सुरक्षेत वाढ केली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. याबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीच्या निमित्ताने खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी त्या बोलत होत्या. ज्या भारताच्या सुपुत्राने आपल्याला संविधान दिलं अशा या महामानवाचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण येथे आलो आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधानाच रक्षण आमच्याकडून नेहमी केलं जाणार आहे, असंही सुळे यावेळी म्हणाल्या.
अब की बार गोळीबार सरकार वर शिक्का मोर्तब
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ही घटना खूपच धक्कादायक आहे. त्या भागात अनेक ज्येष्ठ नागरिक हे सकाळी मॉर्निंग वॉकला जात असतात. मुल शाळेत जात असतात, अनेक लोक रस्त्यावर असतात आणि अस असताना जर भर रस्त्यात गोळीबार होत असेल तर अब की बार गोळीबार सरकार वर शिक्का मोर्तब झाला आहे. काही महिन्यांपूर्वी सत्तेत असलेल्या आमदारांकडून पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केला जात आहे. याचा अर्थ असा की ट्रीपल इंजिन सरकारकडून अशा गोळीबाराला कोणाचं तरी सहकार्य किंवा आशीर्वाद आहेच ना, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
पुढे बोलताना म्हणाल्या, राज्यातील या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कायद्याचा धाक राहिला नसल्याने राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. राज्यात गोळीबाराच्या घटना सतत घडत आहेत. पुण्यातदेखील कोयता गँगची दहशत सुरूच आहे. कोयता गँगला पुन्हा डोकं वर काढू देणार नाही, असं सांगितलं जातं. तरीही कोयता गँगची दहशत पुणे परिसरात कायम आहे. महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारमधील नेत्यांचा गुन्हेगारीला आशीर्वाद आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे. हे गृहमंत्र्यांचे अपयश आहे, असा हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी केला.