पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यात आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका केली. ‘भाजप घर, पक्ष फोडतेच पण आता विद्यार्थ्यांचे पेपरची फोडत आहे. विद्यार्थ्यांकडे पुरावे आहेत’, असे त्या म्हणाल्या.
पुण्यात महाविकास आघाडी आणि इंडिया फ्रंटचा मेळावा पार पडला. यावेळी सुप्रिया बोलत होत्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या, आता काँग्रेसमुक्त भारतऐवजी काँग्रेसयुक्त भाजप झालं आहे. आज सत्तेत आल्यावर सगळे बाहेरचेच दिसत आहेत. भाजपसाठी लाठ्याकाठ्या खाल्लेल्या मूळ भाजप नेत्यांचं वाईट वाटतं. काँग्रेस भवन ही फक्त इमारत नाही तर मंदिर आहे. भाजपने अशोक चव्हाण यांच्यावर आरोप केले आणि आज ते त्यांच्यासोबत आहेत.
भाजप आता ‘भ्रष्टाचारी जुमला पार्टी’ झाली
भाजप आता ‘भ्रष्टाचारी जुमला पार्टी’ झाली आहे. काँग्रेस पक्षाचे आभार. मला तीन वेळा निवडून देण्यात मोठं योगदान आहे. सोनिया गांधी या राज्यसभेवर जाणार असल्याने दुःख झालं. त्या एक उत्कृष्ट संसदपटू आहेत. त्या लोकसभेत नसल्याची उणीव मला आणि भाजपच्या चांगल्या खासदारांना वाटेल’.
संजय राऊत, अनिल देशमुख यांचा अभिमान वाटतो
तसेच संजय राऊत आणि अनिल देशमुख यांचा अभिमान वाटतो. भाजपची देशात सत्ता आल्यावर निवडणूक होणार नाही. देशात दडपशाही सुरु आहे. आम्ही कुणालाही घाबरणार नाही. ही सभा भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र, देश करण्याची नांदी आहे. संघर्षात मज्जा आहे. आम्हाला चिन्ह देऊ नका असा वकिलांचा युक्तिवाद होता. पक्ष ही देवू नका मात्र सुप्रीम कोर्टाने सांगितला की पक्ष ही मिळेल आणि चिन्ह ही मिळेल. चांगलं आणि ऐतिहासिक चिन्ह मिळालं. आजपासून आपण लोकसभेच्या तयारी करुयात, असेही सुप्रिया सुळे यावेळी बोलताना म्हणाल्या.