पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तब्बल 12 दिवसांनी अखेर सरकार स्थापन झालं. 5 डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानात महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी काल महाराष्ट्र राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तशी देवेंद्र फडणवीस यांची शपथ घेण्याची तिसरी वेळ ठरली आहे. त्यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अशातच सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्याकडे लाडक्या बहिणींसाठी एक गोष्ट मागितली आहे.
महायुती सरकारने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कल्याणकारी योजना राबवल्या. त्यात सर्वात प्रभावी ठरली, ती म्हणजे लाडकी बहिण योजना. या लाडक्या बहिण योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा केले जातात. महायुती सरकारने त्यासाठी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
सरकार स्थापन झाल्यानंतरही योजना सुरु राहिल का? असा अनेकांच्या मनात प्रश्न आहे. महायुतीच्या नेत्यांनी या योजना सुरु राहतील असं वेळोवेळी सांगितलं आहे. महायुतीने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातून महिन्याला 1500 ऐवजी 2100 रुपये जमा करण्याच आश्वासन दिलं आहे. आज खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुतीला त्याच आश्वासनाची आठवण करुन दिली आहे.
नेमकी काय केली मागणी?
“देवेंद्रजी म्हणाले की, लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून 2100 रुपये देणार आहोत. नवीन वर्ष सुरु होतय. डिसेंबर किंवा जानेवारी, डिसेंबर महिना सुरु झालाय, पण शक्य असेल, तर डिसेंबरपासूनच किंवा 1 जानेवारी 2025 पासून लाडक्या बहिणीच्या खात्यात महिना 2100 रुपये जमा करा. आम्ही तर म्हणतो 3 हजार रुपये द्या, कारण आम्ही सत्तेवर आलो असतो, तर महिना 3 हजार रुपये देणार होतो” असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.