पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षात बंडखोरी करून सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी केल्यानंतर पक्षात उभी फूट पडली. या राजकीय उलथापालथीनंतर प्रथमच दिवाळी सण साजरा होत आहे. दरवर्षी पवार कुटुंबिय दिवाळीनिमित्त एकत्र येतात. मात्र, यंदाच्या दिवाळीत शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का, याची उत्सुकता होती. दरम्यान, भाऊबीजेनिमित्त सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या काटेवाडीत जाणार असल्याची माहिती मिळत आहे. प्रतिभा पवार देखील गोविंद बागेतून काटेवाडीच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. मात्र, यावेळी शरद पवार देखील अजित पवारांच्या निवासस्थानी जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.(Ajit Pawar)
दरम्यान, पवार कुटुंबाची भाऊबीज दरवर्षी एकत्रित साजरी होते. यंदा अजित पवार, जय पवार, सुप्रिया सुळे, प्रतिभा पवार, पार्थ पवार, शर्मिला पवार, श्रीनिवास पवार, अजित पवारांच्या दोन बहिणी, रणजित पवार, जयंत पवार हे सर् वअजित पवारांच्या निवासस्थानी भाऊबीजेनिमित्त एकत्र आले आहेत. भाऊबीजेनिमित्त शरद पवार देखील काटेवाडीत हजेरी लावणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे संपूर्ण पवार कुटुंब एकत्र असताना आता शरद पवारांची प्रतीक्षा आहे.(Sharad pawar)
सुप्रिया सुळेंनी धनत्रयोदशीला प्रतापराव पवार यांच्या पुण्यातील घरी झालेल्या छोटेखाणी दावतमध्ये मतभेत आहेत. मात्र, कुटुंब म्हणून एकत्र आहोत, असे वक्तव्य केले होते. त्या छोटेखाणी दावतमध्ये अजित पवार, सुनेत्रा पवारदेखील उपस्थित होत्या. काल पाडव्यानिमित्त अजित पवार गोविंद बागेत जाणार का? यावरुन चर्चा रंगली असतानाच सुप्रिया सुळेंनी रात्री पोस्ट केलेल्या फोटोतून या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. त्यांनी रात्री पोस्ट केलेल्या फोटोत अजित पवार थेट शरद पवारांच्या मागे दिसून आले. त्यामुळे कितीही मतभेद असले तरी पवार कुटुंबीय एकत्र असल्याचे स्पष्ट होत आहे.(Supriya Sule)
आज संपूर्ण पवार कुटुंब भाऊबीज साजरी करण्यासाठी काटेवाडीतील अजित पवारांच्या निवासस्थानी जाणार आहेत. अनेक सदस्य काटेवाडीत पोहचले आहेत. मात्र, शरद पवार हे बारामती तालुक्यातील पणदरे येथे शेतकऱ्याच्या बांधावर जाणार आहेत. काही दिवसांपूर्वी संजय जगताप या शेतकऱ्याने एकरी १३७ टन उत्पादन घेतले होते, त्या शेतकऱ्याच्या बांधावर शरद पवार जाणार आहेत. या दौऱ्यानंतर शरद पवार काटेवाडीला जाणार का, याची उत्सुकता आहे.