पुणे : लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. काही दिवसांतच तारखा जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातच बारामती लोकसभेची निवडणूक यंदा केंद्रस्थानी असणार आहे. त्यातच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील एका लग्न समारंभाला खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी हजेरी लावली होती. या सोहळ्यात दोघेही शेजारी-शेजारी बसले होते. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. या चर्चेचा विषय नेमका काय होता, याची माहिती मिळाली नाही. मात्र, हर्षवर्धन पाटील आगामी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना छुपा पाठींबा देणार की, युतीधर्म पाळून अजित पवारांच्या उमेदवाराचा प्रचार करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. या भेटीमुळे बारामतीची राजकीय गणिते बदलणार का? असा प्रश्नही विचारला जात आहे.
दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच ‘आमच्या पाठीत ३ वेळा खंजीर खुपसला’ असा टोला अजित पवार यांना लगावला होता. तुम्ही आमचं विधानसभेला काम केलं तरच आम्ही लोकसभेला तुम्हाला मदत करू, असा इशाराच अंकिता पाटलांनी दिला होता. त्यानंतर काही दिवसांतच सुप्रिया सुळे आणि हर्षवर्धन पाटील यांची भेट आणि एकमेकांसोबत चर्चा झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, अजित पवारांच्या विरोधामुळेच २०१९ मध्ये पाटील यांच्यावर भाजपमध्ये प्रवेश करण्याची वेळी आली होती. काँग्रेसवर नाही तर अजित पवारांवर आरोप करत हर्षवर्धन पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांना पराभवाला सामोरे जावे लागले. माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्यांचा पराभव केला होता. सध्या भरणे अजित पवार यांच्या गटात आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पाटील आगामी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना छुपा पाठींबा देणार का, अशी चर्चा आहे.
बारामती लोकसभेसाठी अजित पवारांनी पूर्ण तयारी केली आहे. त्याठिकाणी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार याच उभ्या असतील हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यातच हर्षवर्धन पाटील यांचे पुत्र राजवर्धन पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवणारच अशी घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी काळात हर्षवर्धन पाटील अजित पवारांना मदत करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.