दौंड : राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार या पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी (दि१८) मोठे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. बारामती लोकसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा खासदार झालेल्या सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा चौथ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र या निवडणुकीत सुळेंची टक्कर त्यांची भावजय सुनेत्रा पवार यांच्यासोबत आहे. त्यामुळे सुळे यांना ही निवडणूक एकतर्फी नसून चांगलीच कसरत करावी लागणार आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत पुणे येथील नवीन विधान भवन कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांच्याकडे दाखल केला. याप्रसंगी काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख व आमदार सचिन अहिर, सुषमा अंधारे, आमदार विश्वजित कदम, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार संग्राम थोपटे, आमदार संजय जगताप, आमदार अशोक पवार, माजी आमदार जयदेव गायकवाड, युगेंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील, दाैंड तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, रामभाऊ टुले यांच्यासह महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवार म्हणून मी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहे. त्यामुळे बारामती मतदारसंघातील जनता मला पुन्हा एकदा लोकसभेत पाठवण्याची संधी देईल, असा विश्वास सुळे यांनी व्यक्त केला.