जुन्नर : देवेंद्र फडणवीस आधी मुख्यमंत्री होते. नंतर ते उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर आता अर्धे उपमुख्यमंत्री आहेत. असे म्हणत, सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय. त्याशिवाय भाजपाचा दिल्ली दरबार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अपमान करत असल्याची टीका केली आहे.
भाजपाने देवेंद्र फडणवीस यांची दोन वेळा पदोन्नती केली आहे, मला वाईट वाटतं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या तिसऱ्या दिवसाची आज जुन्नर येथून त्या बोलत होत्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. सुप्रिया सुळे यांच्याबरोबर खासदार अमोल कोल्हेदेखील उपस्थित होते.
सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस हे पाच वर्षे मुख्यमंत्री होते. दुर्दैवाने आता भाजपाचं सरकार असूनही ते मुख्यमंत्रीपदी कायम राहिले नाहीत. त्यांना फारसे अधिकारही दिले जात नाहीत. महाराष्ट्रातला एक कर्तृत्ववान नेता मोठा झाला, मुख्यमंत्री झाला, परंतु, तुम्ही (भाजपा) त्यांना आता उपमुख्यमंत्री केलं आहे. तुम्ही त्यांचा आणखी किती अपमान करणार आहात?
हा फडणवीस यांच्यावरचा अन्याय नाही का? मी विरोधक म्हणून बोलत नाही. एखादा नेता कष्ट करत असेल, स्वतःच्या ताकदीवर १०५ आमदार निवडून आणत असेल तर त्याचा मानसन्मान करायला नको? परंतु, एका मराठी माणसाचा दिल्ली दरबारात अपमान केला जातोय. याचं मला खूप वाईट वाटतं, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.