हिंजवडी (पुणे): बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा भाजपवर पलटवार केला आहे. शरद पवार यांना राजकीय दृष्ट्या संपवण्याचे षडयंत्र भारतीय जनता पक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बारामती लोकसभा जिंकण्यासाठी भाजपमधील सर्व नेते एकवटले आहेत. परंतु, आम्ही मात्र केवळ सत्याच्या मार्गाने बारामती लोकसभा जिंकू, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी हिंजवडीमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्राचे लढवय्ये नेते शरद पवार यांना राजकारणातून कायमचं संपवायचं, हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या तोंडून महाराष्ट्रासह अवघ्या देशांने ऐकले आहे. काही दिवसांपूर्वी बारामतीमध्ये येऊन चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना संपवायचे, अशी भाषा वापरली. यावेळी भाजपच्या जे पोटात आहे, ओठावर आले. हे भाजप नेत्यांचे आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचे षडयंत्र असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.