पुणे: राज्यातील अनेक दिग्गज उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे पुण्यात गुरुवारी सभांचा एकच धडाका दिसून आला. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या नामनिर्देशानंतर झालेल्या सभेत अनेक नेत्यांची जोरदार भाषणं झाली. यामध्ये खासदार सुप्रिया सुळेंनीही आपल्या भाषणातून केंद्र सरकारसह राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी, त्यांनी पवार कुटुंबातील बारामती मतदारसंघाच्या लढतीवर भाष्य करताना सुनेत्रा पवारांना जोरदार टोला लगावला आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर, आयोजित केलेल्या सभेतून त्यांनी मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मतदान करण्याचं जनतेला आवाहन केले. तसेच, आपल्या विजयाचा विश्वासही व्यक्त केला. तर दुसरीकडे पुण्यात महाविकास आघाडीकडून शिरुरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे, पुण्याचे रविंद्र धंगेकर,बारामतीतून सुप्रिया सुळे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतरच्या सभेत खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंनी जोरदार भाषणे केली. बारामतीतील विकास मीच केला आहे, म्हणणाऱ्या अजित पवारांना आपण कार्य अहवाल पाठवणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे.
मी गेल्या दहा वर्षांमध्ये किती निधी आणला, त्यांना माझा कार्य अहवाल मी एकदम छान पॅकिंग करून पाठवणार आहे. माझा तो अहवाल मराठीतही आहे, असा जोरदार टोलाही अजित पवारांना लगावला. तसेच, त्यांनी माझा कार्य अहवाल वाचला तर ते लोक देखील मलाचं मतदान केल्याशिवाय राहणार नाहीत. तसेच, ते मला म्हणतात हे रडत बसतील. पण, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी शारदाबाई पवारांची नात आहे, रडत बसणारी नाही. त्यांनी मला लढायला शिकवलं आहे, रडायला नाही, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी अजित दादांसह आपल्या वहिनींना टोला लगावला.
मी खूप नशिबवान आहे, निवडणूक आयोगाकडून मला तुतारी हे चिन्ह मिळालं. तुतारी ही सर्व ठिकाणी शुभकार्यासाठी असते. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारले होते, तेव्हाही तुतारीच वाजली होती. आता आपल्याला ही तुतारी रविंद्र धंगेकर यांच्याहाती देऊन त्यांना विजयी करायचे आहे. शाहू-फुले-आंबेडकर, जितेगा धंगेकर.. अशी घोषणाही खासदार सुळेंनी यावेळी दिली. तसेच आमच्या एका हातात तुतारी आणि दुसऱ्या हातात मशाल आहे. रामकृष्ण हरी अन् वाजवा तुतारी अशी नवी घोषणाही सुळेंनी यावेळी दिली.