पुणे : पुण्यात कोयता गॅंगची दहशत पुन्हा वाढली आहे. हवेत कोयता फिरवून, मारण्याची धमकी देत अल्पवयीन तरुण ठिकठिकाणी दहशत माजवतानाचे चित्र दिसत आहे. परिसरात दहशत निर्माण करून नागरिकांना भयभीत करणाऱ्या या अल्पवयीन गॅंगला पोलिसांनी चांगलेच दमात घेतले आहे. पुणे पोलिसांनी या अल्पवयीन तरुणांवर कारवाई करत, पोलिसांनी सर्वांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील येरवडा भागात ५ जणांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड केली. या संदर्भात ४० वर्षीय महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवर तत्काळ अॅक्शन घेत हातात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या अल्पवयीन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनमध्ये सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकमेकांच्या परिचयाचे आहेत. आरोपींनी फिर्यादी यांच्या घरासमोर पार्क केलेल्या वाहनांची कोयत्यांनी तसेच दगडांनी तोडफोड करून नुकसान केले. तसेच परिसरात आरडाओरडा करून जमलेल्या लोकांना “तुम्ही याठिकाणी थांबू नका, नाही तर तुम्हाला देखील सोडणार नाही,” अशी धमकी देवून हवेत कोयता फिरवून दहशत निर्माण केली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. हे सर्व आरोपी अल्पवयीन आहेत.