युनूस तांबोळी
शिरूर : शेतकरी कुटुंबातील महिला वर्षभर शेतात राबतात. प्रसंगी अंगमेहनतीची अवजड कामेही करतात. व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून शेती करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे, बाजारपेठेतील चढ-उतारामुळे त्यांना अडथळ्यांच्या शर्यतीचा सामना करावा लागतो. कमी कालावधीची व कमी खर्चाची पिके घेऊन महिलांना तंत्रशुद्ध शेती करता यावी तसेच त्यांच्यामधील व्यावसायिक दृष्टिकोनाला खतपाणी घालता यावे, यासाठी महिलांना पाठबळ देण्याची गरज आहे.
खऱ्या भारताचे दर्शन खेड्यात होत असल्याने गांधीजींनी ‘खेड्यांकडे चला’ अशी हाक दिली होती. गावखेड्याचे सक्षमीकरण हा यामध्ये महत्त्वपूर्ण हेतू होता. आजही या अभिनव मोहिमेची उपयुक्तता जाणवते. शहरातील वाढता बेरोजगारीचा प्रश्न, वाढती गर्दी यामुळे गांधीजींचा हा मूलमंत्र आर्थिक समस्येचे निराकरण करण्याचा मार्ग सुचवतो.
खरीप असो वा रब्बी हंगाम, शेतीत महिलांचे योगदान किती मोठे असते, हे वेगळे सांगायची गरज नाही. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून किंबहूना मोठे योगदान देऊन महिला श्रेयापासून वंचित राहतात. संकटांशी आणि आव्हानांशी सामना करण्याची उपजत वृत्तीच त्यांना शेतीत काम करण्याचे बळ देते. शेत शिवारात मशागतीसह काडी कचरा वेचणे, निंदणी, कोळपणी, पेरणी, बियाणे तयार करण्यासह उत्पादन येईपर्यंत महिलांचा सहभाग अधिक असतो.
कष्ट अधिक, पण भाव ठरविण्याचा अधिकार नाही…
खरेदी व विक्री बाजारपेठेत प्रत्येक मालावर किमान विक्रीमूल्य छापलेले असते. मात्र, शेतीमालावर कोणतेही मूल्य नसते. ऊन, थंडी, वाऱ्यात दिवसभर काबाडकष्ट करणारी महिला मात्र बाजारपेठेच्या विक्री व्यवस्थापनात कोठेही आढळून येत नाही. तिला तिच्या मालाला भाव ठरविण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. विक्री व्यवस्थापनात यापुढे हे बदल होणे गरजेचे आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील शेतकऱ्यांची पिळवणूक थांबविण्यासाठी गुंतवणूकीला परवानगी देऊन पर्यायी शेतीमाल विक्रीची व्यवस्था उभारणे गरजेचे आहे.
सेंद्रिय शेतीची चळवळ उभारणे गरजेचे
सद्यस्थितीत रासायनिक खते न वापरता शेणखताचा वापर करून पुर्णपणे सेंद्रिय शेती करता येऊ शकते. पिकणाऱ्या धान्याचा संबंध थेट सर्वसामान्य जनतेच्या पोटाशी येत असल्याने रासायनिक खतांचा वापर टाळला पाहिजे. सेंद्रिय शेती करणे आज गरजेचे असून, त्यासाठी सेंद्रिय शेतीची चळवळ उभारणे गरजेचे आहे.
– सिद्धेश ढवळे, शिरूर तालुका कृषी अधिकारी
शेतमालाचा भाव ठरविण्याचा महिलांना मिळावा
सततची नापिकी तसेच निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतीत भांडवल गुतंवून बॅंकेच्या कर्जाचा बोजा वाढत आहे. त्यातून शेतमालाच्या पिकाला बाजारभावाचा अधिकार नसल्याने चढउताराच्या बाजारभावाला शेतकरी कंटाळला आहे. ग्रामीण भागातील महिला ही शेती व्यवसाय संभाळत योगदान देत असते. त्यामुळे शेतमालाचा भाव ठरविण्याचा अधिकार शेतकरी महिलांना मिळावा.
– वंदना खामकर, शेतकरी महिला
शासन व लोकप्रतिनीधींची अनास्था
अवेळी पाऊस, गारपिट, दु्ष्काळ यामुळे शेतमालाचे अतोनात नुकसान होत आहे. वातावरणातील बदलाने शेती व्यवसाय डबघाईला आला आहे. त्यातून शेतमालाला मिळणारा निचांकी दर शेतकरी कुटुंबांना हानिकारक ठरत आहे. अनेक शेतकरी महिलांना संसार सावरत जीवन कंठावे लागत आहे. त्यातून शासन व लोकप्रतिनीधी यांच्या अनास्थेमुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
– गायत्री चिखले, शेतकरी महिला