पुणे : पुण्यातील बोपदेव घाट परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या तरूणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली होती. या घटनेने राज्य ढवळून निघालं होतं. या प्रकरणातील नराधम आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर पिडित तरूणीला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणातील पीडित तरुणीला विधी सेवा प्राधिकरणाकडून ‘मनोधैर्य’ योजने अंतर्गत पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. विधी सेवा प्राधिकरणाकडून याबाबतचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे. विधी सेवा प्राधिकरणाच्या ‘मनोधैर्य’ योजनेच्या अंतर्गत अत्याचार प्रकरणातील पीडितांना मदत केली जाते.
पुणे शहर परिसरातील बोपदेव घाटात 3 ऑक्टोबर रोजी मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीला कोयत्याचा आणि शस्त्रांचा धाक दाखवून 3 नराधमांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणावरून अटक केली आहे, त्यांच्या तिसऱ्या साथीदाराचा शाेध घेण्यात येत आहे.
या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. या घटनेतील पिडितेला आता नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. ‘मनोधैर्य’ योजनेच्या अंतर्गत नुकसान भरपाई मिळवण्यासाठी पीडित तरुणीने विधी सेवा प्राधिकरणाकडे अर्ज केला होता. अर्ज दिल्यानंतर नऊ दिवसांमध्ये संबंधित अर्ज मंजूर करून पीडित तरुणीला नुकसान भरपाई देण्यात येत आहे. नुकसान भरपाईसाठी मिळणाऱ्या रकमेपैकी 25 टक्के रक्कम ही तरुणीला रोख रकमेच्या स्वरूपात देण्यात येणार आहे. तर उर्वरित 75 टक्के रक्कम ही दहा वर्षांसाठी पीडित तरुणींच्या नावे बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवण्यात येईल. या रकमेतून मिळणाऱ्या व्याजातून ती उपचार घेऊ शकणार आहे, त्याचबरोबर इतर दैनंदिन खर्च भागवण्यासाठी तिला मदत होणार आहे.
मनोधैर्य योजना…
एखाद्या घटनेतील पीडित बालक किंवा महिलेचं पुनर्वसन करण्यासाठी ‘मनोधैर्य’ योजना सुरू करण्यात आलेली आहे. विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी होते. संबधित पीडित महिलेला कमीत कमी 30 हजार रुपयांपासून जास्तीत जास्त दहा लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाते. पीडित महिलांना आधार आणि धैर्य मिळण्यासाठी या योजनेची सुरूवात करण्यात आली होती.