पुणे : पुण्यामधील पोर्श कार अपघात प्रकरणाने संपूर्ण देश ढवळून निघाला होता. सर्व स्तरावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या प्रकरणात पोलीस आणि ससून रुग्णालय, बाल न्याय मंडळाच्या भूमिकेने तर व्यवस्थेविरोधात रोष निर्माण झाला होता. त्यानंतर या प्रकरणावरून शरद पवार यांनी वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर जोरदार टिका केली होती. अशातच आता सुप्रिया सुळे यांनी जाहीर सभेत सुनील टिंगरे, तुम्ही खुनी आहात, असा जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा निशाणा साधला आहे.
मी स्वतः सुनील टिंगरे विरोधात प्रचार करणार..
सुनील टिंगरे, तुम्ही खुनी आहात. रक्त बदलण्याचे पाप तुम्ही केले आहे. पोर्शे कार अपघातावरून सुप्रिया सुळे यांनी जोरदार टिका केली. तुमच्या दोन्ही हातावर खून आहे, असा आरोप सुळें यांनी केला. पोर्शे कार आहे म्हणून तुम्ही त्यांची बाजू घेताय? मी स्वतः सुनील टिंगरे विरोधात प्रचार करणार, जंग जंग पछाडणार. त्या आईला न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प राहणार नाही. तुम्ही बिर्याणी आणि पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनला जाता, हे पोलीस स्टेशन आहे, तुमच्या घरातलं डायनिंग टेबल नाही. ही मस्ती घरी दाखवायची, तुमची मस्ती सर्वसामान्य माणसांच्या अश्रूसमोर चालणार नाही, असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
तुम्ही भ्रष्टाचारी आहात माझा आरोप..
गरीबांच्या आयुष्याची किंमत ही कराल? पोर्शवाल्यांना बिर्याणी द्याल, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. सुनील टिंगरेंना यावेळेस घरी पाठवा, ती जबाबदारी तुमच्यावर आहे. कुठल्या तोंडाने तुम्ही मत मागणार, तुम्ही भ्रष्टाचारी आहात माझा आरोप आहे. तुम्ही खुनी आहात, रक्त बदलण्याचं पाप तुम्ही केलं? त्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये फोन कोणी केला? रक्त बदलण्यासाठी फोन कोणी केला? देवेंद्र फडणवीस यांनीच याची उत्तर द्यावीत? असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. दरम्यान या आरोपानंतर सुनील टिंगरे यांची उमेदवारी धोक्यात आल्याचे म्हटले जात होते, पण अजित पवार यांनी या सर्व चर्चांना विराम देत सुनील टिंगरे यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.