पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. असे असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांची भोर येथील निवासस्थानी भेट घेतली.
काही आठवड्यांपूर्वी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अनंतराव थोपटे यांची भेट घेत नवा डाव टाकला होता. 40 वर्षांपासून विरोधक असलेल्या थोपटे यांची भेट घेतल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर आता तटकरे यांनी देखील थोपटे यांची भोर येथील निवासस्थानी भेट घेऊन चर्चा देखील केली.
दरम्यान, काही आठवड्यांपूर्वी शरद पवारांनी संग्राम थोपटे यांची भेट घेत खासदार सुप्रिया सुळे यांच्या अडचणी कमी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर विजय शिवतारे यांनी अनंतराव थोपटे यांची भेट घेत अजित पवार दादागिरी करत असल्याचे त्यांच्या कानावर घातले होते.
बारामतीच्या राजकारणात ‘ट्विस्ट’
बारामतीतील राजकारण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहेत. एकीकडे अजित पवारांचे सख्खे भाऊ त्यांच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. त्यात अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटाकडून बारामतीची जागा लढवणार असल्याची विधाने केली जात आहेत. त्यामुळे बारामतीच्या राजकारणात ‘ट्विस्ट’ पाहिला मिळत आहे.