पुणे : लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघ सर्वाधिक चर्चेचा विषय बनला होता. बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा थेट सामना झाला होता. शरद पवारांच्या घरातील एक मुलगी आणि एक सून एकमेकींच्या विरोधात उभ्या राहिल्या. मात्र, या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा दारुण पराभव केला. दरम्यान, लोकसभेच्या निकाल लागून दोन महिने झाल्यानंतर अजित पवार यांनी एक आश्चर्यकारक विधान केलं आहे. बारामतीमध्ये बहिणीविरोधात उमेदवारी देऊन मी चूक केली, अशी कबूली अजित पवार यांनी दिली आहे.
काही दिवसापूर्वी अजित पवार यांनी थेट त्यांचे काका आणि राजकीय मुरब्बी नेते शरद पवार यांनाच आव्हान दिलं होतं. साहेब तुमचं आता वय झालं आहे, तुम्ही आम्हाला सल्ला द्या, मार्गदर्शन करा आमचं काही चुकलं तर सांगा पण आता आराम करा, असं म्हणत शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यायला हवी, असं अजित पवार यांनी शरद पवार यांना सुचवलं होतं.
दरम्यान, अजित पवार महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर भाषणात त्यांनी शरद पवारांवर टीकेची झोड सोडली. तसंच त्यांच्या भूमिका बदलण्याचा आपल्याला कसा वारंवार त्रास झाला हे देखील सांगितलं. त्यानंतर आता अजित पवार यांनी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार हा जो सामना लोकसभेला झाला तो व्हायला नको होता, असं म्हणत अजित पवार यांनी त्यांची चूक मान्य केली आहे.
काय म्हणाले अजित पवार?
सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं पण बहिणी सगळ्या लाडक्या आहेत. अनेक घरांत राजकारण चालतं. राजकारण हे पार घरात शिरु द्यायचं नसतं. मागे मात्र, माझ्याकडून थोडी चूक झाली. मी माझ्या बहिणीच्या विरोधात माझी पत्नी सुनेत्राला उभं करायला नको होतं. पार्लमेंट्री बोर्डाने तो निर्णय घेतला होता. आता जे झालं ते एकदा बाण सुटल्यासारखं होतं. आज मला माझं मन सांगतं आहे, की तसं व्हायला नको होतं. असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.