लोणी काळभोर : जिद्द, चिकाटी, मेहनत आणि अभ्यास करायची तयारी असेल तर यश निश्चित मिळते आणि ध्येय नक्की गाठता येते. परिस्थिती हलाखीची असतानादेखील हेच लोणी काळभोर (हवेली) येथील एका झोपडीत राहणाऱ्या रिक्षाचालकाच्या मुलाने करून दाखविले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेड मार्क्सचे नियंत्रक जनरल (वर्ग-अ) या परीक्षेत सुलेमान जलील अहमद अन्सारीने पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण यशाला गवसणी घातली आहे. हे यश मिळवून सुलेमान अन्सारी याने लोणी काळभोरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यामुळे त्याचे लोणी काळभोरसह जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व शिक्षण क्षेत्रातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडून भरभरून कौतुक होत आहे.
पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेड मार्क्सचे नियंत्रक जनरलची परीक्षा जानेवारी 2024 ला घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच लागला आहे. या परीक्षेत सुलेमान अन्सारीने उत्तीर्ण होऊन यश संपादित केले. या यशासाठी सुलेमानने कोणत्याही शिकवणीला न जात घरीच अभ्यास केला आणि हे यश मिळविले आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मुले मुली लाखो रुपये भरून क्लास लावतात. परंतु सुलेमान अन्सारी यांनी कोणताही स्पर्धा परीक्षेचा क्लास न लावता घरीच अभ्यास केला आणि पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. त्यांच्या या यशामुळे गावातील युवकांना प्रेरणा मिळाली आहे.
सुलेमानचे वडील जलील अहमद अन्सारी हे लोणी काळभोर परिसरात रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तर सुलेमानची आई ताहेरा गृहिणी आहे. अन्सारी दाम्पत्यांना चार मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. सुलेमान हा सर्वात मोठा मुलगा आहे. सुलेमानचे सर्व भावंडेही उच्च शिक्षित आहेत. आपल्या मुलांना चांगले शिकवून उच्चपदस्थ बनवण्याचा ध्यास जलील अहमद अन्सारी यांनी सुरुवातीपासून घेतला होता. सुलेमानची घरची परिस्थिती अत्यंत बेताची. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्याला शिक्षणाची मोठी आवड होती.
सुलेमानने प्राथमिक शिक्षण लोणी काळभोर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून तर माध्यमिक शिक्षण पृथ्वीराज कपूर मेमोरिअल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधुन घेतले. त्यानंतर पुढील शिक्षण पुण्यातील एच व्ही देसाई महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून पदवी पूर्ण केली. तर पुणे विद्यापीठातून भौतिकशास्त्र शस्त्र विषयातून उच्च पदवी प्राप्त केली. व सुलेमान आता आयआयटी जोधपुर येथे पीएचडीचा अभ्यास करीत आहे.
सुलेमानने लहानपणीच आपण मोठे अधिकारी होऊन प्रशासकीय सेवेत काम करावे, असे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न सुलेमानला स्वस्थ बसू देत नव्हते. त्यानंतर सुलेमानने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सन 2023 साली करण्यास सुरवात केली. आणि पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेड मार्क्सचे नियंत्रक जनरलची परीक्षा जानेवारी 2024 ची सर्वात प्रथम परीक्षा दिली. या परीक्षेत पहिल्या प्रयत्नात तो उत्तीर्ण झाला. त्यानंतर सुलेमानची मुलाखत घेण्यात आली. यामध्येही सुलेमान गुणवत्ता यादीत बसला आहे. आणि लवकरच नागपूर येथे राजपत्रित अधिकाऱ्याच्या प्रशिक्षणासाठी जाणार आहे.
दरम्यान, रिक्षाचालकाचा मुलगा सुलेमान अन्सारी याने पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेड मार्क्सचे नियंत्रक जनरलच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या यशातून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. परिस्थिती नसताना सुलेमान अन्सारी यांनी यशाचे शिखर गाठून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. अभ्यासात सातत्य, मोठे होण्याची जिद्द, चिकाटी व प्रामाणिक कष्ट घेतले तर यश नक्कीच मिळते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे सुलेमान अन्सारी होय.
याबाबत पुणे प्राईम न्यूजशी बोलताना सुलेमान अन्सारी म्हणाले की, मी लोणी स्टेशन परिसरातील जय हिंद नगरमध्ये झोपडीत राहतो. घरची परिस्थिती खूप नाजूक असल्याने आमच्या घरी लाईट नव्हती. आम्ही दिवा व मेणबत्तीवर अभ्यास केला. आईवडिलांनी नेहमी मार्गदर्शन केल्यामुळे आम्ही भावंडांनी उच्च शिक्षण घेतले आहे. या यशाचे खरे मानकरी माझे आई-वडील, बहिण, भाऊ व मित्रपरिवार आहेत. त्यामुळे हे यश मी त्यांना समर्पित करतो. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही अडचणींना न घाबरला सामोरे जावा. अभ्यासात सातत्य ठेवा. यश तुम्हाला नक्कीच मिळेल.