पुणे : पुण्यातील गुरुवार पेठेतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीने राहत्या हॉस्टेलवर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शहरातील मध्यवर्ती भागातील गुरुवार पेठेत ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अभिलाषा मित्तल (27) असं आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या तरुणीच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याचं प्राथमिक पोलीस तपासात समोर आलं आहे. मात्र, ही हत्या आहे का? आत्महत्या याचा तपास पोलिस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिलाषा मित्तल ही तरूणी मूळची वाशिम जिल्ह्यातील आहे. गेल्याच महिन्यात ती स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आली होती. शहरातील मध्यवर्ती भागातील गुरुवार पेठेत असणाऱ्या एका मुलींच्या हॉस्टेलमध्ये ती सध्या राहत होती. दरम्यान, हॉस्टेलमधल्या एका खोलीत तिने गळफास घेत आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. अभिलाषाच्या अंगावर मारहाणीच्या काही खुणा सापडल्याने ही आत्महत्या आहे की हत्या, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. पोलिसांनी अभिलाषाच्या नातेवाईकांची आणि मैत्रिणींची चौकशी केली आहे.
याबाबत मैत्रिणीने सांगितले कि, अभिलाषा ही होस्टेलच्या खोलीमध्ये एकटीच होती. तिने खोलीचा दरवाजा आतून बंद केला आणि गळफास लावून आत्महत्या केली. नंतर आम्ही दरवाजा उघडण्यासाठी प्रयत्न केला, मात्र आतून कसलाच आवाज आला नाही. नंतर खिडकीतून पाहिले असता अभिलाषाने आत्महत्या केल्याचं दिसलं. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.