पुणे : पुण्यात गृहनिर्मिती प्रकल्पातील आर्थिक वादातून बांधकाम व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात घडली आहे. किशोर मनोहर बेट्टीगिरी (वय-५२, रा. पद्मनाभ बंगला, रायकरनगर, धायरी) असं आत्महत्या केलेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी भागीदारासह त्याच्या मुलांविरुद्ध सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बेट्टीगिरी यांची पत्नी सविता (वय-४८) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी भागीदार सुरेंद्र बाबुराव लायगुडे, संग्राम सुरेंद्र लायगुडे, सागर सुरेंद्र लायगुडे (तिघे रा. धायरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेट्टीगिरी कुटुंबीय मूळचे कर्नाटकातील आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पुण्यातील धायरी परिसरात स्थायिक झाले आहेत. बेट्टिगिरी आणि सुरेंद्र लायगुडे यांनी भागीदारीत बांधकाम व्यवसाय सुरु केला होता. धायरी येथील बारंगिणी मळा येथे राजवीर ॲव्हेन्यू गृहप्रकल्पाचे काम सुरू होते. स्वाती कन्सलटन्सीकडून संग्राम लायगुडे, त्याचा भाऊ सागर यांनी बेट्टीगिरी यांना ९१ लाख रुपये दिले होते.
तर बेट्टीगिरी यांनी ८० लाख रुपये परत केले होते. त्यानंतर लायगुडे यांनी उर्वरित पैशांसाठी तगादा लावून गृहप्रकल्पाचे काम दाेन ते तीन वेळा बंद पाडले होते. तसेच संग्राम आणि त्याचा भाऊ सागर यांनी गृहप्रकल्पातील दोन व्यावसायिक गाळे ताब्यात घेतले होते. उर्वरित पैसे देता येत नसतील तर, जीव दे, अशी धमकी लायगुडे यांनी पतीला दिली.
तेव्हापासून ते नैराश्यात होते. त्यानंतर बेट्टीगिरी यांनी गळफास घेऊन जीवन संपवलं, अशी फिर्याद बेट्टीगिरी यांची पत्नी सविता यांनी दिली आहे. दरम्यान, बेट्टीगिरी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे. या घटनेचा तपास उपनिरीक्षक श्रीकांत सावंत करत आहेत.