Suicide News: सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी (Barshi) शहरात सुनेच्या त्रासाला कंटाळून एका वृद्धाने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सर्जेराव शंकर नायकुडे (वय 73, रा. उपळाई रोड, बार्शी) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्जेराव नायकुडे हे बार्शी शहरातील वसुंधरा बंगल्यात राहत होते. त्यांच्या मुलगा महेश नायकुडे यांनी या घटनेबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, त्यांचा भाऊ उमेश याची पत्नी सारिका उमेश नायकुडे ही गेल्या काही महिन्यांपासून सर्जेराव नायकुडे यांना वारंवार अपमानित करत होती. किरकोळ कारणांवरून वाद घालणे, अपमानास्पद बोलणे आणि घरातून बाहेर काढण्याची धमकी देणे, असा मानसिक त्रास त्यांना दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या सततच्या वादामुळे आणि अपमानामुळे सर्जेराव नायकुडे मानसिक तणावात होते. अखेर या त्रासाला कंटाळून त्यांनी मंगळवारी सकाळी सुमारे 10.30 वाजण्यापूर्वी राहत्या घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी महेश नायकुडे (वय 41) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सून सारिका उमेश नायकुडे हिच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 108 नुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक माकणे करत आहेत.







