पुणे : पुण्याच्या अपर जिल्हाधिकारीपदी सुहास शंकरराव मापारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे आदेश महाराष्ट्र शासनाचे उपसचिव महेश वरुडकर यांनी शुक्रवारी (ता. 4) दिले आहेत.
पुण्याचे तत्कालीन अपर जिल्हाधिकारी अजय मोरे यांची बदली झाल्याने, रिक्त असलेल्या पदासाठी अहमदनगर जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मापारी यांनी तत्काळ पदभार स्वीकारावा, असे शासनाच्या आदेशात म्हटले आहे.
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात कार्यरत असताना सुहास मापारी यांनी सात-बारा उताऱ्यांसह फेरफार, इनाम जमिनी आदी महसूल विभागाशी संबंधित माहितीचे रेकॉर्ड हे स्कॅनिंग करून ई-रेकॉर्ड संबंधित उल्लेखनीय काम केले आहे. तसेच हे रेकॉर्ड सर्वांना सहज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या अनेक कामांना गती मिळाली आहे. त्यामुळे सुहास मापारी यांनी आपल्या कामाचा वेगळाच ठसा उमटविलेला आहे.