ओमकार भोरडे / तळेगाव ढमढेरे : शिरूर-न्हावरा रोडवर नियमाचे उल्लंघन करून थांबवलेल्या उसाच्या ट्रॉलीला दुचाकीची पाठीमागून जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकी वरील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गोरक्षनाथ मोहन घायतडक (वय-51 वर्षे, रा. करडे, ता. शिरूर, जि. पुणे) असं अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. ही घटना 30 नोव्हेंबर रोजी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास आंबळे शिरूर न्हावरा रोडवर घडली आहे.
याप्रकरणी मच्छिंद्र मोहन घायतडक (वय 47, रा. करडे, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी ट्रॅक्टरचालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबळे शिरूर न्हावरा रोडवर न्हावरे ते आंबळे शिवरस्त्याच्या पुढे शिरूर बाजुकडे ट्रॅक्टर चालकाने नियमाकडे दुर्लक्ष करून त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टरला उसाने भरलेली ट्रॉली जोडुन रस्त्यावर उभे केले. तसेच कोणतेही इंडीकेटर तसेच पार्किंग लाईट न लावता, पाठीमागे कोणतेही रिप्लेक्टर न लावता, उभा करून निघुन गेला. त्यामुळे अंधारामध्ये समोर ट्रॅक्टर ट्रॉली न दिसल्याने गोरक्षनाथ घायतडक यांनी त्यांच्या दुचाकीवरून न्हावरा बाजुकडुन शिरूर बाजुकडे येत असतांना ट्रॉलीला मागुन धडक बसली. या अपघातात घायतडक यांचा मृत्यू झाला.
याबाबतच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार थेऊरकर करीत आहेत.