लोणी काळभोर : पूर्व हवेली डॉक्टर्स एसोसिएशन व कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने नायगाव (ता. हवेली) येथील ऊस तोडणी कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आल्याची माहिती नायगाव उपकेंद्राच्या डॉ. सुखदा कदम यांनी दिली.
नायगाव (ता. हवेली) येथील ऊस तोडणी कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन बुधवारी (ता.६) करण्यात आले होते. यावेळी कामगारांना लसीकरणाचे महत्व, किशोरवयीन मुलींना आरोग्य शिक्षण आणि महत्त्व पटवून दिले. यावेळी गरोदर मातांची तपासणी करण्यात आली. तसेच पल्स पोलियो 2024 च्या अनुषंगाने सर्व 5 वर्षाखालील बालकांना पोलियो डोस देण्यात आला.
दरम्यान, या आरोग्य तपासणीसाठी डॉ. नेहा मटकर, डॉ. डी. जे. चांदणे, परिचारिका रोहिणी बिरंगळ, बाळासाहेब चोपडे व रंजना सालगुदे यांचे बहुमूल्य सहकार्य मिळाले.
केवळ रोजगार बुडतो म्हणून…
नायगाव येथील विदारक दृश्य बघून खूपच वाईट वाटले. स्वच्छ्ता कशाला म्हणतात हेच त्यांना माहीत नाही. अशुद्ध पाणी पितात. त्यामुळे जुलाब, उलट्या यांसारखा आजार होतो. त्यानंतर आजारी असल्यातरी कोणतेही औषधोपचार करत नाहीत. दवाखान्यात जाण्याचे टाळतात. कारण असे केल्यास रोजगार बुडतो, अशा मानसिकस्थितीत सध्या हे लोक राहत आहेत.
– डॉ. सुखदा कदम, नायगाव उपकेंद्र