पुणे : देशातील सहकारी साखर कारखान्यांना पुढील पाच वर्षांत केंद्र सरकारकडून २५ हजार कोटी रुपये मिळतील, असा दावा सहकार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे. यामध्ये राज्यातील साखर कारखान्यांचाही फायदा होणार आहे, अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडियावर दिली आहे.
मागील आठवड्यात दिल्ली येथे राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण बैठक पार पडली. यावेळी सहकारमंत्री अमित शहा यांनी साखर कारखान्यांची आर्थिक क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने सर्वसमावेशक पंचवार्षिक योजना तयार करण्याची सूचना दिली. तसेच साखर उद्योगाला चालना मिळण्यासाठी मार्गदर्शन देखील केले.
साखर उद्योगासाठीचा निधी २५ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट आहे, असंही अमित शाह यावेळी म्हणाले. या उपक्रमामुळे साखर उद्योगाची वाढ भरभराट होईल, आर्थिक स्थिरता येईल आणि या क्षेत्राच्या दीर्घकालीन विकासाला पाठबळ मिळेल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला आहे.
केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, सहकार चळवळीतील ‘एनसीडीसी’च्या योगदानाची प्रशंसाही अमित शहा यांनी केली आहे. राज्य आणि जिल्हा सहकारी बँकांना केंद्र सरकारच्या योजनांशी जुळवून घेण्यात मदत करण्यासाठी सहकार मंत्रालयाने ‘एनसीडीसी’च्या मदतीने योजना सुरू केली असे, असं मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी सांगितले.
या पार्श्वभूमीवर सहकार राज्यमंत्री मोहोळ यांनी सहकारी साखर कारखान्यांना पुढील पाच वर्षांत ‘एनसीडीसी’च्या माध्यमातून २५ हजार कोटी रुपये मिळणार असल्याचे सोशल मीडियावर शेअर केले आहे.