पुणे : पुणे विमानतळावरील सततच्या गैरसुविधांमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. प्रवाशांना रोजच हवाई प्रवासातील अडथळ्यांच्या शर्यतीचा सामना करावा लागत आहे. अनेक विमानांना काही तासांचा विलंब होत आहे, शिवाय विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींकडे याचे समाधानकारक उत्तर नसल्याने प्रवासी त्रस्त होत आहेत. त्यातच २६ जानेवारीपर्यंत दिल्लीहून येणारी आणि दिल्लीला जाणारी अशी दोन्ही बाजूची विमाने रद्द केल्याने प्रवासी त्रासले असून, सावळा गोंधळ वाढतच आहे.
एखाद्या विमानाला सुरुवातीला तासभर उशीर होणार असल्याचे विमान कंपनीकडून प्रवाशांना कळविले जाते. काही वेळानंतर पुन्हा दोन तास उशीर होणार असल्याचे प्रवाशांना सांगितले जाते. यामुळे प्रवाशांचा गोंधळ वाढत आहे. त्यातच विमानतळावरील विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींकडे याचे समाधानकारक उत्तर नसल्याने प्रवासी त्रस्त होत आहेत. हा प्रकार सर्वाधिक इंडिगोच्या विमानसेवेबाबत होत आहे, अशी तक्रार अनेक प्रवाशांनी केली आहे. विमानतळावर चेक-इन करण्यासाठी एक तासांहून अधिक काळ रांगेत थांबावे लागत असल्याचे आता नित्याचेच बनले आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली विमानतळावर हवाई सराव सुरू आहे. त्यामुळे २६ जानेवारीपर्यंत सकाळी १०.२० ते दुपारी १२.४५ या कालावधीत उड्डाणे बंद ठेवण्यात आली आहेत. यामुळे दिल्लीहून पुण्याला येणारी आणि पुण्याहून दिल्लीला जाणारी अशी दोन विमाने रद्द करण्यात आली आहेत. त्याचाही फटका प्रवाशांना बसत आहे. अनेक प्रवाशांनी विमानातून उतरल्यानंतर बॅगा ताब्यात घेताना त्या फाटल्याची तक्रार केली आहे. डिजियात्रासाठी आधी टोकन घ्यावे लागत असून, त्यानंतर त्याचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे प्रक्रिया केवळ नावालाच असून, प्रत्यक्षात टोकनसाठी कागदाचा वापर केला जात आहे, असेही अनेक प्रवाशांनी निदर्शनास आणून दिले.
विमानतळाचे नवीन टर्मिनल ते एरोमॉल हे अंतर अर्ध्या किलोमीटरहून अधिक आहे. नवीन टर्मिनलमध्ये टॅक्सीला प्रवेश देण्याची भूमिका विमानतळ प्राधिकरणाने घेतली होती. यावरून गदारोळ होताच नवीन टर्मिनलपासून प्रवाशांना एरोमॉलपर्यंत नेण्यासाठी बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे.