वाघोली / संतोष गायकवाड : वाघोलीतील बाजारतळ मैदानात श्रीमंत गणेश तरुण मंडळाच्या नवरात्र महोत्सवाची तयारी जोरदार सुरु आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, प्रसिद्ध अभिनेते, अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सागर गोडसे यांनी दिली आहे.
हवेली तालुक्यात वाघोलीतील सर्वात जुने मंडळ म्हणून श्रीमंत गणेश तरुण मंडळाकडे पाहिले जाते. नवरात्र उत्सवाचे सर्व आयोजन आणि नियोजन श्रीमंत गणेश तरुण मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून केले जाते. मंडळाकडून आयोजित करण्यात येणारा नवरात्र उत्सव व सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी भक्तांची व प्रेक्षकांची अतूट गर्दी होत असते. लहानमुलांच्या खेळण्यांची दुकाने, विविध स्टॉल, आकाश पाळणे, लहानमुलांना दहा दिवस आनंदाची एक पर्वणीच असणार आहे.
सुरक्षेची चोख खबरदारी म्हणून मंडळाच्या वतीने परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. १९९७ पासून मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव उत्सव साजरा केला जातो. पंचक्रोशीतील नागरिक मोठ्यासंख्येने दर्शनासाठी येतात.
नवरात्रोत्सवानिमित्त १५ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या दरम्यान ‘बाळूमामांच्या नावाने चांगभल’ फेम सिने अभिनेता बाळू मामा, लावणी सम्राज्ञी माधुरी पवार, मुळशी पॅटर्न फेम सिने अभिनेता राहुल्या, होम मिनिस्टर, धुमाकूळ, भारुड, ‘ही नार नखऱ्याची’ हिंदी व मराठी गीतांचा बहारदार नजराणा तसेच अॅड. गणेश म्हस्के पाटील लिखित छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ज्वलंत एक झुंजार योद्धा ‘रौद्र शंभो’नाटक त्याबरोबर बंडू पवार प्रेझेंटस् ‘द मेलडी स्टॉर्स’ ऑक्रेस्ट्रॉ यासह ‘नाद करा पण, आमचा कुठ’ आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
२८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी भव्य मिरवणूक सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी श्रीमंत गणेश तरुण मंडळ नवरात्र उत्सव विश्वस्त महादेव कोलते, बाळासाहेब जगताप, मुख्य संयोजक संदीप ज्ञानेश्वर थोरात, संयोजक राजेंद्र ज्ञानोबा सातव, श्रीमंत गणेश तरुण मंडळाचे अध्यक्ष सागर गोडसे, संयोजक सचिव दीपक हरिहर, उपाध्यक्ष सुरज बाळासाहेब सातव, अनिल थोरात यांच्यासह उपाध्यक्ष मंडळाचे सदस्य परिश्रम घेत आहेत.