इंदापूर : भवानीनगर ता. इंदापूर येथील सुनिता निकाळजे चव्हाण यांची महसुल सहाय्यकपदी निवड झाली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत यश मिळवत सुनिता निकाळजे चव्हाण यांनी महसूल सहाय्यक पदाला गवसणी घातली आहे. विशेष म्हणजे त्यांनी कोणतीही खाजगी शिकवणी न लावता स्वतः जिद्द व चिकाटीने अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नाची यश मिळवले आहे.
सुनिता निकाळजे यांनी मिळवलेल्या यशामुळे त्यांच्या कुटुंबाचे स्वप्न साकार झाले आहे. स्पर्धा परीक्षा देण्यासाठी पैसे नसले किंवा अनुकूल परिस्थिती नसली तरी यश मिळवता येते हे निकाळजे याणी दाखवून दिले आहे. त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होते आहे.
निवड प्रक्रिया पारदर्शक झाल्यामुळे ग्रामीण भागातील मुला मुलींचा स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्याची टक्केवारी वाढू लागली आहे. मोहन नगरमधील सुनिता यांच्या यशाची अशीच कहाणी आहे. सुनिता यांचे माहेर आणि सासरची कुटुंब मध्यवर्गीय आहेत. वडील बांधकाम मजूर आहेत तर पतीही ॲक्युप्रेशर उपचारक आहेत. सुनिता यांनी स्वतः पार्ट टाइम ब्युटी पार्लरचे काम करून अभ्यास केला आहे. त्यांचा मुलगा मुलगा फिजिओथेरपीचे शिक्षण घेत आहे.
2001 ला बारावी पास झाल्यानंतर सुनिता यांचे लग्न झाले. सासरच्या प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी पुढील शिक्षण तब्बल बारा वर्षांनी म्हणजे 2013 नंतर पूर्ण केले आणि एम.ए पूर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची सुरुवात केली. सुनिता यांनी राष्ट्रवादी करिअर अकॅडमी बारामती येथे मुलासोबतच अभ्यासाला जायला सुरुवात केली. मुलगा आणि सुनिता एकाच ग्रंथालयात सोबत अभ्यास करीत असत. याच जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सुनिता निकाळजे यांनी महसूल सहाय्यक या पदाला गवसणी घातली आणि यशाचा नवा पायंडा पडून दिला. संसाराचा गाडा हाकता हाकता यशाची उंची सुद्धा गाठता येते याच उदाहरण निकाळजे यांनी घालून दिले आहे.
– संकलन सौ अनुराधा राऊत, वाहक, PMPML