संतोष पवार
पळसदेव : शासनाच्या वतीने राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजना कार्यान्वित आहे. शाळांमध्ये पोषण आहार बनवणाऱ्या आचारी व मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या सद्यस्थितीत असणाऱ्या २ हजार ५०० रुपये प्रति महिना मानधनामधील राज्य हिस्स्सामध्ये १ हजार प्रति महिना इतकी वाढ करुन ३ हजार ५०० रुपये इतके मानधन अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
यासाठी लागणारा एकूण १७५. २० कोटी वार्षिक निधीला मान्यता देण्यात आली आहे. राज्य व केंद्र शासनाच्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेमधील इयत्ता१ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रस्तुत योजनेंतर्गत लाभ देण्यात येतो. विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात वैविध्यता आणण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन संरचित आहार पध्दतीनुसार (तांदूळ, डाळी / कडधान्यापासून तयार केलेला आहार, मोड आलेले कडधान्य (स्प्राऊटस) व गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर व नाचणीसत्व) आहार देण्याचा निर्णय ११ जून २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे.
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून प्रस्तुतप्रमाणे विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत तीन संरचनेत आहार पद्धतीप्रमाणे पोषण आहाराचा लाभ देण्यासाठी अतिरिक्त एकूण 66.67 कोटी इतका वार्षिक निधी सदर योजनेच्या सर्वसाधारण घटकांतर्गतच्या राज्य हिस्स्यामध्ये मंजूर करून खर्च करण्यास मान्यता दिली आहे.