संदिप टूले / दौंड : सध्या दुधाच्या दरात प्रचंड घसरण झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्याला पुन्हा आर्थिकदृष्ट्या ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला ७ रुपये अनुदानावरून प्रतिलिटर १० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केली.
यावेळी आमदार राहुल कुल म्हणाले की, शेतकऱ्यांच्या दृष्टीने दूध अनुदानाचा विषय महत्त्वाचा असून मागील सरकारने दुधाला ७ रुपयापर्यंत अनुदान दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. परंतु अनेक तरुणाचा रोजगार मोठ्या प्रमाणावर दूध उत्पादनावर अवलंबून आहे. त्यामुळे अनुदान हे ७ रुपयांवरून १० रुपये या दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे अशी मागणी त्यांनी हिवाळी अधिवेशनात केली.
उत्पन्न आणि खर्चात मेळ बसत नाही, अनेक दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहे. खरतर गाईचे दूध प्रतिलिटर ३५ ते ४० रुपये, तर म्हशीचे दूध प्रतिलिटर ४५ ते ५० रुपये दर मिळणे गरजेचे आहे. सरकारने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे असून अनुदान वाढवणे फार गरजेचे आहे. या वाढवून येणाऱ्या अनुदानातून दूध उत्पादकांना थोडाफार दिलासा नक्की मिळेल. आमदार राहुल कुल यांनी आम्हा दूध उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न अधिवेशनात मांडला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो.
भाऊ थोरात, दूध उत्पादक शेतकरी